Type Here to Get Search Results !

अनिल देशमुख यांची चौकशी

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ११ मेला ईडीने या प्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल  देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते.

बार मालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. यावेळी वाझेने ही रक्कम १ नंबरसाठी घेत असल्याचे सांगितल होते. या प्रकरणी देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित चार कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. ईडीने देशमुख व कुटुंबीयांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २४ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये आपापसात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात ईडी अधिक तपास करत आहे.

 या प्रकरणी ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे यांना २६ जूनला अटक केली होती. ते देशमुख यांचे सर्व व्यवहार पाहत असल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स पाठवले होते.

‘परमबीर सिंह यांचे आरोप खोटे’

ईडीने ज्यावेळी आमच्या घरावर छापे टाकले, तेव्हा मी, माझ्या परिवाराने, माझ्या कर्मचाऱ्यांनी सर्वांनी त्यांना सहकार्य केले, असे देशमुख यांनी सांगितले. आपल्याला सीबीआयचेही दोन वेळा समन्स आले. त्यांच्याकडेही जाऊन मी माझा जबाब दिला आहे. अजूनही माझे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर झालो आहे.  मुंबईचे माजी पोलीस आयु्क्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंहांनी माझ्यावर खोटे आरोप केले, ते आता कुठे आहेत, याबाबत वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत. त्यानुसार परमबीर सिंह भारत सोडून पळून परदेशात गेले असे म्हटले आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप  केले, ती व्यक्तीच देश सोडून पळून गेली. परमबीर सिंहविरोधात अनेक व्यावसायिकांनी पोलिसांकडे जाऊन तक्रारी केल्या आहेत, असेही यावेळी देशमुख यांनी म्हटले आहे. याशिवाय देशमुख यांनी या प्रकरणी एक पत्रही ट्वीट केले आहे.

The post अनिल देशमुख यांची चौकशी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mzX3YE
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.