पर्यावरणपूरक मूर्ती नसल्यास मूर्तिकारांची अनामत रक्कम जप्त, दोन वर्षांसाठी नोंदणी रद्द
मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवापासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार होणार आहे. पर्यावरणपूरक मूर्ती नसल्यास संबंधित मूर्तिकाराने पालिकेच्या तिजोरीत जमा केलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी मूर्तिकाराची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ताजिया इत्यादी सण, उत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत याकरिता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची समन्वय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने पालिकेने यावर्षीच २०२२ च्या उत्सवांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. २०२२ मधील गणेशोत्सवापासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तिकार-कलाकार, गणेशोत्सव मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींसाठी स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच मूर्ती विसर्जनाबाबत स्वतंत्र सूचनांचा यात समावेश असून, राज्य स्तरावरील प्रदूषण नियंत्रण मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची माहिती बैठकीदरम्यान उपस्थितांना देण्यात आली.
या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापली मते मांडली. शाडूच्या मातीची मूर्ती तयार करण्यास अधिक कालावधी लागतो व जागादेखील अधिक लागते, असे नमूद करीत महापालिकेने भविष्यात मूर्तिकारांना मंडप परवानगी देताना ती अधिक जागेसाठी व अधिक कालावधीसाठी द्यावी, असे मत मांडले.
सुधारित मार्गदर्शक सूचना
’ मूर्ती केवळ नैसर्गिक, जैविकदृष्टय़ा विघटनशील आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या असाव्यात.
’ सजावट पानाफुलांची असावी. प्लास्टिक प्रतिबंधित असेल.
’ मूर्ती रंगविताना तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणारे रंग हे पर्यावरणपूरक असावे.
’ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मूर्तिकारांची नोंदणी असणे आवश्यक.
’ पूजेदरम्यान फुले, पत्री, वस्त्र आदींचा सजावटीसाठी वापर करण्याची सूचना
’ समुद्रात मूर्ती विसर्जन करताना संबंधित सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या जागी आणि ओहोटी रेषा व भरती रेषा ोयामध्ये विसर्जन करण्यास अनुमती.
’ घरगुती स्तरावरील मूर्ती विसर्जन हे घरच्या-घरी करण्यास प्राधान्य.
The post प्लास्टर ऑफ पॅरिस पुढील वर्षी हद्दपार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mamgY8
via IFTTT