Type Here to Get Search Results !

पालिकेच्या मराठी शाळांची फरपट

१० वर्षांत ६५ टक्क्यांनी विद्यार्थी कमी

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : गेल्या दशकभरात पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी शाळांची संख्याही कमी झाली असून १३० मराठी शाळा बंद पडल्या, तर विद्यार्थ्यांची संख्या ६५ टक्क्यांनी घटली आहे.

मुंबई महापालिकेने चालू शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई व आयसीएसईच्या मिळून १२ शाळा सुरू केल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे पालिकेच्या मराठी शाळा मात्र एकापाठोपाठ एक बंद पडत असून मराठी शाळांतील विद्यार्थी संख्याही घटत असल्याचे दिसू लागले आहे.

जागतिकीकरणामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढू लागला आहे. गरीब घरातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा खर्च परवडत नसल्याचे सांगत पालिकेने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या व अन्य बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा वेगाने बंद पडू लागल्या असून बंद पडलेल्या शाळेतील पटसंख्या जवळच्याच दुसऱ्या मराठी शाळेत विलीन करण्याची पालिकेवर वेळ आली आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत माहिती मागवली. गेल्या दहा वर्षांत मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या ६७,०३३ने घसरली, तर याच दहा वर्षांत मराठी माध्यमांच्या १३० शाळा बंद पडल्या. विद्यार्थी संख्येत ६५ टक्के तर शाळांची संख्या ३१ टक्क्यांनी घटली आहे.

भाजपची शिवसेनेवर टीका

मराठी शाळांच्या अधोगतीवरून भाजपने शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले. गेली तीस वर्षे मराठी अस्मितेचा आधार घेत मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेने मराठी शाळांची संख्या वाढण्यासाठी काय प्रयत्न केले. मराठी शाळांची पटसंख्या घसरत राहिली तर येत्या काही वर्षांत मराठी मुलांसाठी मराठी शाळा उरणार नाही, असा सवाल साटम यांनी केला.

हिंदूी, उर्दू माध्यमांत दुप्पट विद्यार्थी

मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली असली तरी हिंदूी आणि उर्दू या प्रादेशिक माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत असून ती मराठी विद्यार्थ्यांच्या दुप्पट आहे.

माध्यम शाळा   विद्यार्थी

मराठी   २८३    ३५,१८१

हिंदूी    २२७    ६३,२०२

उर्दू     १९३    ६२,५१६

वर्ष        मराठी शाळा   पटसंख्या

२०१०-११            ४१३       १,०२,२१४

२०११-१२             ३९६        ९२,३३५

२०१२-१३             ३८५        ८१,२१६

२०१३-१४            ३७५         ६९,३३०

२०१४-१५       ३६८        ६३,३३५

२०१५-१६       ३५०        ५८,६३७

२०१६-१७             ३२८        ४७,९४०

२०१७-१८        ३१४        ४२,५३५

२०१८-१९              २८७       ३६,५१७ 

२०१९-२०              २८३       ३५,१८१

The post पालिकेच्या मराठी शाळांची फरपट appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3iohHIs
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.