मत्स्यविक्रीसाठी विक्रेत्यांची रस्त्यावरच पथारी; पर्यायी जागेला विरोध कायम
मुंबई : जागेच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने दादर येथील मासळी बाजारातील मासे विक्रेत्यांनी गेल्या महिन्यापासून थेट रस्त्यावर मासे विक्री सुरू केली आहे. हा मासळी बाजार जमीनदोस्त करून दीड महिना लोटला तरी अद्याप या मासळी विक्रेत्यांचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने दिलेल्या पर्यायी जागेला विरोध करीत विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच मासळी विक्री सुरू केली आहे.
रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, मासळी बाजारातून येणारा कचरा, भुसा आणि नागरिकांना होणारा त्रास अशा अनेक कारणांचा विचार करून पालिकेने दादर मासळी बाजारावर हातोडा चालवला. कोणतीही पूर्वसूचना न देता हा बाजार जमीनदोस्त केल्याने विक्रेत्यांनी आंदोलन केले. त्यानंतर न्यायालयात धाव घेतली. या वेळी पालिकेने दिलेल्या पर्यायी जागाही मासळी विक्रीसाठी अयोग्य असल्याचे न्यायालयात पुढे मांडण्यात आले.
न्यायालयाने हे निष्कासन अन्यायकारक असल्याचे सांगत त्यावर स्थगिती आणली. तसेच मासळी विक्रेते व पालिका अधिकारी यांनी वाद मिटवून यावर तोडगा काढण्याचेही सूचित केले. सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण निकालात निघणे अपेक्षित होते. परंतु पालिकेने दिलेली ऐरोली आणि मालाड येथील जागा विक्रेत्यांना मान्य नाही.
‘ऐरोली येथील मासळी बाजार मासळी विक्रीसाठी योग्य नाही. तिथे कोणत्याही सुविधा नाहीत. शिवाय स्थानिकांनीही विरोध केला आहे. हीच अवस्था मालाड बाजाराची आहे. तिथे आधीच्या मच्छीमारांमध्ये आणि आमच्या आपापसात तेढ निर्माण होईल,’ असे विक्रेत्या कांचन तापोरी यांनी सांगितले.
विक्रेत्यांचे म्हणणे..
‘हा बाजार आता सुरू झालेला नाही. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ हा बाजार सुरू असून काही विक्रेत्यांची तिसरी पिढी इथे व्यवसाय करत आहे. प्लाझा चित्रपट गृहानजीक असलेला हा बाजार १९९७ मध्ये सेनापती बापट मार्ग येथे स्थलांतरित झाला. त्या वेळी केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर आम्ही स्थलांतर केले. आज तोच बाजार पालिकेने उद्ध्वस्त केला. इथल्या विक्रेत्यांचा विचार करून पालिकेने आम्हाला याच परिसरात पर्यायी जागा द्यावी,’ अशी मागणी विक्रेत्यांनी केली.
दादर मासळी बाजाराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पालिकेने दिलेली पर्यायी जागा विक्रेत्यांना मान्य नसल्याने पेच वाढला आहे. न्यायालयाचा निर्णय आताअंतिम असेल.
– प्रकाश रसाळ, साहाय्यक आयुक्त, बाजार विभाग
The post दादर मासळी बाजाराचा पेच कायम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Y0q05W
via IFTTT