मुंबई : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदभरतीकरिता अनुक्रमे २४ व ३१ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा आधी घोळ घातलेल्या वादग्रस्त कंपनीकडूनच घेतली जाणार आहे. राज्य सरकारने ‘न्यासा’ या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले नसल्याने त्यांच्यामार्फतच परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तसेच परीक्षेसाठी महसूल व पोलीस विभागांची मदत घेतली जाणार आहे.
कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाची पदभरतीसाठीची परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलावी लागल्याने सुमारे आठ लाखांहून अधिक उमेदवारांनी रोष व्यक्त केला होता व राज्य सरकारवर टीका झाली होती. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आरोग्यमंत्री टोपे, विभागाचे अधिकारी, महा आयटी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांना परीक्षा प्रक्रियेबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. कंपनीला आवश्यक सर्व सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन होत आहे की नाही आणि गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडूनही प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
हलगर्जीबाबत कारवाई?
महा आयटी किंवा सामान्य प्रशासन विभागाने न्यासा किंवा अन्य कंपन्यांना काळ्या यादीत टाकलेले नाही. त्यामुळे पॅनेल कंपन्यांमधूनच निवड करून हे काम देण्यात आल्याची भूमिका आरोग्य विभागाने घेतली. आता परीक्षेच्या तारखा घोषित केल्याने अन्य कंपनीमार्फत काम करून घेणे शक्य नाही. त्यामुळे हलगर्जीबाबत न्यासा कंपनीला आर्थिक दंड किंवा काळ्या यादीत टाकण्याची कारवाई परीक्षेनंतर करण्याबाबत विचार होणार आहे.
The post आरोग्य विभागाची परीक्षा वादग्रस्त ‘न्यासा’कडूनच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oomgXc
via IFTTT