|| अनिश पाटील
मुंबई : प्रत्यक्षात खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता ४५ कोटींचा कर गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने गिरगाव येथील एका व्यावसायिकाला अटक केली आहे. आरोपींकडून मिळालेल्या बोगस पावत्यांच्या सहाय्याने ४५ कोटींची कर सवलत देभरातील कंपन्यांनी मिळवल्याचा संशय आहे. याप्रकरणात आरोपीने सात कंपन्यांचा वापर केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
आरोपी व्यावसायिक भगवानराम बिष्णोई हे गिरगाव कुंभारवाडा येथील ब्राऊन इंटरप्रायजेस कंपनीचे मालक आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ब्राऊन इंटरप्रायजेस व इतर कंपन्यांच्या व्यवहारांवर जीएसटी विभाग लक्ष ठेऊन होता. याप्रकरणी शोधमोहिमही राबवण्यात आली होती. त्यात ब्राऊन इंटरप्राईजेस , आदित्य ओव्हरसीज, जॉली इंटरप्राईजेस, ब्राऊन ट्र्रेंडग व रॉयल इम्पेक्स या कंपन्या एकमेकांना केवळ खरेदी-विक्रीच्या पावत्या देत असून प्रत्यक्षात कोणत्याही वस्तूची देवाण-घेवाण होत नसल्याचे जीएसटीच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्याच्या माध्यमातून व्यवहार दाखवून करात सवलत मिळवली जाते. देशभरातील अनेक कंपन्यांसोबत या कंपन्यांचे कागदोपत्री व्यवहार झाल्याचे जीएसटीच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी २८ सप्टेंबरला जीएसटी विभागाने बिष्णोईचा जबाब नोंदवला होता.
झाले काय?
सात कंपन्यांचे दररोजचे व्यवहार हाताळत असल्याचे बिष्णोईने सांगितले होते. त्यासाठी या कंपन्यांच्या मालकांना महिन्याला १५ ते २० हजार रुपये दिले. त्यानंतर या कंपन्यांच्या माध्यमांतून अनेकांना बोगस व्यवहारांच्या पावत्या देण्यात आल्या. त्याच्या माध्यमातून इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवून जीएसटी विभागाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी व्यवहार बँकेत झाला असून त्यातील दीड ते दोन टक्क्यांचे कमिशन वगळण्यात आले. त्यामुळे ४५ कोटींची कर सवलत मिळवण्यात आली आहे.
The post कर परताव्याच्या नावाखाली ४५ कोटींची फसवणूक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3uoPjuM
via IFTTT